Marathi Katha | Marathi Goshta | Marathi Story | Stories in Marathi | Marathi goshti
Stories in Marathi: मी आजच्या या लेखामध्ये लहान मुलांसाठी Marathi Katha घेऊन आलो आहे. या सर्व कथा लहान मुलांना जीवनाचे धडे शिकवायला मदत करतील.
च्या आजच्या या लेखात मुलांसाठी मजेदार, शैक्षणिक आणि विशेष कथांचा संग्रह आहे आणि प्रत्येक कथेमध्ये एक लपलेला संदेश आहे जो मुलांसाठी उपयुक्त आहे.
शापित राजपुत्र | Shapit Rajputra Marathi Katha
विजय नगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप-तप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा-राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेष घेऊन आला आणि राजाला म्हणाला, ‘जर तुम्ही मला वचन देत असाल, तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन.’ राजा म्हणाला, ‘मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन.’ मग साधू म्हणाला, ‘तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील, पण ते दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत.’ राजाने विचार केला की, दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले. साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा-राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू मागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची.
इकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला ‘तू आमच्या बरोबर चल’ असे म्हटले. मुलाच्या मनातसुध्दा त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसर्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, ‘आई-बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका.’
दुसर्या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला.
तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाणा होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला.
तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळय़ात घालून असायची.
साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तर्हेतर्हेचे डोंबार्याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला ‘तुला काय हवे?’ असे विचारले. साधू म्हणाला, ‘राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे.’ राजकन्येने माळ देण्याचे नाकारले, पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले.
मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खर्या स्वरूपात प्रगट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.
देव कसा दिसतो | Dev Kasa Disato Marathi Goshta
Dev Kasa Disato Marathi Goshta |
लहानगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे त्याला उमगले. माधवने बाईंना विचारले, ”ध्रुव किती मोठा होता?” बाई उत्तरल्या, ”तुमच्या वयाचा होता.”
माधवचे विचारचक्र सुरू झाले. मला देव दिसेल कां? पण रान कसे असते? शाळेतील एका मोठ्या मुलाने सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात. दुसर्या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे, तेथे खूप झाडे आहेत. माधवने गृहित धरले तेथे नक्कीच देव भेटेल.
एका रविवारी मित्रा बरोबर पार्कमध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले. आईने एका पिशवीत लाडू व सरबताची बाटली दिली.
माधव एकटाच चालत चालत गावाबाहेरील पार्क मध्ये पोहोचला. चालून थकल्यामुळे एका झाडाखाली बसला. भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरीता पिशवी उघडू लागला. तितक्यात समोरच्या झाडाखाली त्याला एक वृद्ध गृहस्थ दिसला. खूप भूकेला वाटत होता. माधवने एक लाडू त्याला नेऊन दिला. वृद्धाने लाडू घेतला व माधवकडे बघून स्मित हास्य केले. माधवला हे हास्य खूप सुंदर दिसले.
हे हास्य परत बघण्याची त्याला इच्छा झाली. त्याने वृद्धाला सरबत नेऊन दिले. यावेळी वृद्ध अधिकच सुंदर हसला. संध्याकाळ होईपर्यंत माधव वृ्धाला लाडू, सरबत देत होता. वृद्धाच्या चेहर्यावरील हास्य अधिकच खुलत होते. अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जाण्यास निघाला. वृद्धाने त्याला प्रेमाने पोटाशी घेतले. माधव खूपच आंनदीत झाला.
घरी पोहचताच आईने त्याची आनंदी मुद्रा बघून विचारले, सहल छान झाली वाटते.
माधव उत्तरला, की आज देवा बरोबर फराळ केला. किती छान हसत होता तो. असे हास्य मी आजवर कधीच बघितले नव्हते.
पार्क मधील वृद्ध देखील आनंदात घरी गेला. मुलाने विचारले, ‘बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे?’
गुरुपदेश | Gurupdesh Story in Marathi
एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला.
कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.
पेन्सिल एक जीवन | Pencile ek Jivan Marathi Gosht
Pencile ek Jivan Marathi Gosht |
आजी, तू काय लिहितेस? माझ्यासाठी गोष्ट लिहितेस? पिंटूने विचारलं. हो तुझ्यासाठीच लिहिते! पण माझ्या लिहिण्यापेक्षा मी ज्या पेन्सिलीने लिहिते ना, ती पेन्सिलच फार महत्वाची आहे. आजी म्हणाली. ‘हं! काहीतरीच काय!’ नेहमी सारखीच तर आहे. ‘तिच्यात विशेष काय आहे?’ पिंटू म्हणाला. ‘अरे, ही पेन्सिल ना आयुष्यात कसं वागावं, कसं जगावं ते शिकवते.’ ‘आजी ही पेन्सिल काय शिकवणार? ‘पिंटूने विचारले. हे बघ, पहिली गोष्ट! पेन्सिल लिहिते, पण तिला लिहितं करणारा हात हा वेगळाच असतो. माणसांचही तसंच आहे! नुसत्या माणसांचंच का, इतर सर्व प्राणी व सर्व सृष्टी यांचा कर्ता करविता हा दुसराच कोणी असतो. त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो.
दुसरं म्हणजे, लिहिताना मधून मधून पेन्सिल तासून तिला पुन्हा टोक करावी लागते. तासताना तिला दु:ख, वेदना जाणवतंच असणार पण ते सहन करून ती पुन्हा नव्यान सुरेक लिहू लागते. आपल्याही आयुष्यात सुख-दु:ख असतात, पण त्यातून न डगमगता त्यातून सुलाखून निघालो की पुन्हा पहिल्या उमेदीनं नव्यांन जगायला ही पेन्सिलच शिकवते.
तिसरी गोष्ट, कधी कधी लिहिलेलं रबरानं खोडून दुरुस्त करावं लागतं. आपल्याही हातून चूका होतात, पण त्या मान्य करून त्या दुरुस्त करणं जमायला हवं.
चौथी गोष्ट, पेन्सिल चांगली का वाईट, हे तिच्या बाह्य रंग रूपावरून समजत नाही. लाकडाच्या आतील शिसे महत्वाचं! तसंच माणसाचं अंतरंग निर्मळ व मजबूत असणं महत्वाचं!
पाचवी, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पेन्सिल दुसर्यासाठी स्वत: झिजून नाहीशी होते पण आपण लिहिलेलं मागे ठेवून जाते. तसंच माणसानंही जाताना आपली खूण, आपली आठवण मागे ठेवून गेलं पाहिजे. समर्थांनी म्हटल्या प्रमाणे, ”मरावे परी कीर्तीरूपी उरावे” आपल्या मागे आपलं कर्तृत्व कायम कसे राहिले ते पाहिलं पाहिजे. म्हणून तुला सांगते, तू या पेन्सिली सारखा हो!
वडिलकीचा सल्ला | Vadilkicha Salla Marathi Story
Vadilkicha Salla Marathi Story |
एक होतं गांव, त्या गावांत एका मुलाचे लग्न ठरले, मुलगी होती शेजारच्या गावातील. तेव्हा शेजारील गावांत लग्न होणार होते. दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती. लग्नात भांडणे व मान अपमान होऊ नये म्हणून लग्नाला वऱ्हाडात कोणाही म्हाताऱ्या माणसांना न्यावयाचे नाही असे तरुण माणसांनी ठरवले.
लग्नाला जाण्यासाठी गाड्या तयार झाल्या. ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्व जण शेजारील गावाकडे निघाले. गावात एक शहाणे समंजस आजोबा होते. ते हळूच आधी शेजारील गावांत गेले व तेथील मंदिरात वेष बदलून राहिले.
ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले. त्यांचे मुलीच्या घरच्या माणसांनी मोठ्या थाटाने आगत स्वागत केले. मुलीच्या कडील माणसांच्या ध्यानात आले की ह्या पाहुण्यांच्या मध्ये एकही वयस्कर माणूस नाही. ही गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही. म्हणून आता या वराकडील लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की, ‘आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसाने द्यावे. ‘
हे मागणे ऐकल्यावर वराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाली. बापरे! आता एवढे तेल आणावे कोठून? सगळे जण आपसात चर्चा करू लागले. वराकडील प्रत्येकाने विचार केला पण कोणाला उत्तर सापडेना. काय करावे! लग्न मोडावे तर परत गावांत गेल्यावर सगळे नांवे ठेवणार! सगळ्यांची तोंडे उतरून गेली. ज्याला त्याला वाटू लागले कीं, आपल्याबरोबर आपण कोणी मोठे माणूस आणले असते तर बरे!
एवढ्यांत वेष पालटलेले त्यांच्या गावचे आजोबा तेथे आले. त्यांनी विचारले, ”कां रे बाबांनो, लग्नघरांत तुम्ही सगळे तोंडे उतरून का बसलात?” तेव्हा त्यातील एक जण म्हणाला,
”काय सांगू तुम्हाला! वधूकडील लोक विहीरभर तेल नजराणा म्हणून मागितं आहेत. कोठून देणार एव्हढे तेल? लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावांतील लोक नांवे ठेवतील, काही सुचत नाही!”
आजोबांनी विचारले, ”तुमच्याकडे कोणी मोठे माणूस नाही का सल्ला द्यावयास? ”
”नाही हो, मुद्दामहून त्यांना वगळले त्याचा आतां पश्चात्ताप होत आहे.”
”बरे! चला मी तुम्हाला सल्ला देतो तसे उत्तर तुम्ही मुलीच्या वडलांना जाऊन द्या.
”म्हणावे, आमची तेलाची विहीर भरून तयार आहे. ती ओतून घेण्यासाठी तुमची पाण्याची विहीर कोरडी करा.”
”अहो आजोबा, आपल्याकडे कुठे तेलाची विहीर आहे.”
”तुम्ही जाऊन तर सांगा. बघा त्यांची विहीर कोरडी होते का?”
वराकडील माणसांनी ते उत्तर मुलीच्या वडिलांना सांगितले. तसे मुलीचे आजोबा हसले व म्हणाले तुम्हाला ज्यांनी उत्तर सुचवले त्यांना घेऊन या.
वराच्या माणसांमागोमाग ते आजोबा पुढे झाले. मुलीच्या माणसांनी त्यांना मानाने बसायवयास लावले. व त्यांची वास्तपुस्त केली तेव्हा त्यांनी आपला वेष उतरवला तो काय वराकडील माणसे चकित झाली. ते त्यांच्यातीलच होते. सर्व वराच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला. ह्यापुढे वयस्कर माणसांचा सल्ला आम्ही घेऊ असे सांगितले. लग्न थाटामाटांत झाले. पुढे कधी कुठलेही कार्य त्या गावांत ठरले की वयस्कर म्हणत, ”आम्ही नाही रे बाबा तुमच्याबरोबर येणार लग्नाला” ह्या वाक्याने गावांत खूप हशा होई.
एकजूट साधती कार्यभाग | Ekjud Sadhti Karybhaag Marathi Katha
Ekjud Sadhti Karybhaag Marathi Katha |
एका जंगलात तमाल वृक्षावर एका चिमणीचे घरटे होते. त्यात त्या चिमणीची अंडी होती. एके दिवशी एक मदोन्मत्त हत्ती नेमका तमाल वृक्षाच्या सावलीत बसायला आला. पण त्याने सोंडेने तमालवृक्षाच्या ज्या फांदीवर चिमणीचे घरटे होते तीच फांदी ओढून घरटे खाली पाडले. त्यामुळे चिमणीची अंडी फुटली.
चिमणी या प्रसंगामुळे जोरजोरात रडू लागली. तिचा एक मित्र सुतार पक्षी जवळच राहत होता. चिमणीच्या रडण्याने तो धावत आला.
सुतार पक्षी तिची समजूत काढू लागला, ”गेलेली अंडी परत येणार का? तेव्हा डोळे पुस आणि पुन्हा उद्योगाला लाग!” तेव्हा चिमणी उत्तरते, ”हे सगळं खरं! पण या मदोन्मत्त हत्तीला ठार करण्याचा उपाय सांग. कारण याने माझी अंडी फोडलीत.”
सुतार विचार करून सांगतो, ”माझी वीणाखा नावाची एक माशी मैत्रिण आहे. तिची मदत घेऊ आपण!” नंतर वीणाखा माशीला सुतार पक्षाकडून हकीगत कळल्यावर ती सांगते, ”माझा मेघनाद नावाचा एक बेडूक मित्र आहे. त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल.”
नंतर सर्वजण मेघनादाकडे जातात. चिमणीची कहाणी ऐकल्यावर तो हत्तीला ठार करण्याची युक्ती सांगते, ”हत्ती दुपारच्या वेळी जेव्हा झोपला असेल तेव्हा त्याच्या कानाशी बसून गोड आवाजात माशीने गुणगुण करायची. मग त्या आवाजाने हत्ती पण बेसावध राहील. त्यानंतर सुतार पक्षी त्याचे डोळे फोडून त्याला आंधळा करील. नंतर त्याला तहान लागल्यावर पाण्यासाठी तडफडू लागेल. मी बाजूच्या खड्ड्याजवळ बसून ”डराव डराव” ओरडलो की हत्तीला वाटेल की इथे पाणी आहे. मग खड्ड्याच्या दिशेने चालत आला की खड्ड्यातच पडणार, मग जिवंत कसला राहणार? ”
मेघनाद बेडकाची कल्पना सगळ्यांना आवडते त्याचप्रमाणे हत्तीला खड्ड्यात पाडले जाते. थोड्या दिवसांनी हत्ती मरण पावतो.
तात्पर्य: एकजूटीने कार्य केल्यास शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्यावर मात करता येते.
राक्षस, चोर आणि ब्राह्मण | Rakshas, Chor aani Bramhan Marathi Story
Rakshas, Chor aani Bramhan Marathi Story |
एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे काही मिळत असे, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.
चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?’
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.
झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!
तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?
राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.
त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.
तात्पर्य: फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.
कावळा आणि साप | Kavala aani Saap story in Marathi
Kavala aani Saap story in Marathi |
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.
दरवेळी असे झाल्याने कावळा-कावळी खूपच दु:खी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा रहात होता. त्या कोल्ह्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.
कावळा कोल्ह्यास म्हणाला, ”दरवेळी आमची पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील.” कोल्हा म्हणाला, ”एखादेवेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही.”
कोल्ह्याने विचार बराच केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली, ”एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेउन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.”
कावळ्यातला हा उपाय एकदम पटला. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते. कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते.
कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई बिळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले.
त्यांनतर कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुषीत होते.
तात्पर्य: काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची युक्तीच श्रेष्ठ ठरते.
पारधी व कबूतर | Pardhi va Kabutar Marathi Katha
एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.
त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा रहात होता. एकदा खाण्यसाठी काही मिळते का हे बघण्यसाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता. एवढ्यात त्याच्या नजरेस काळाकभिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला.
ते बघून कावळ्याला वाटले, ”हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडेच चालला असणार. म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार तर….! कावळा तसाच वडाच्या झाडावर परत आला. आणि सर्व पक्षांना म्हणाला, ” हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे. तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेलात तर त्या जाळ्यात अडकाल!”
पारधी थोड्यावेळातच त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला.
तेवढ्यात चित्रगीव नावाचा कबूतरांचा राजा आपल्या परिवारासमवेत अन्नाच्या शोधासाठी आकाशातून उडत होता. त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले. तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला ‘नको नको’ म्हणत असतानाही चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तटून पडले. खरं म्हणजे चित्रग्रीव स्वत: अतिशय हुशार आणि चाणाक्ष पण चित्रग्रवीच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार?
चित्रग्रीव आपल्या कुटुंबीयांसकट त्या जाळ्यात अडकला. बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खूष झाला. त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला. त्या बरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला.
त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठला. पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली. शेवटी पारधी स्वत:च्या नशिबाला दोष देत मागे फिरला.
पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येताच चित्रग्रीव म्हणाला, ”हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे. आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल.”
हिरण्यक एका टेकडीच्या बिळात रहात होता. तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली. त्याबरोबर हिरण्यक धावत आला. चित्रग्रीवाने घडलेली हकीगत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली. हिरण्यकाने मित्रप्रेमखातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला. तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की, ”आधी माझ्या परिवारचे पाश तोड. आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर.”
हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला. हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले. चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता, हिरण्यक उद्गारतो, ”कधी संकट आले तर मला जरूर हाक मार. मी मदतीला धावून येईन.”
तात्पर्य: संकटसमयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र.
अजब ज्योतिषी | Ajab Jyotishi Marathi Goshta
Ajab Jyotishi Marathi Goshta |
एक ज्योतिषी बाजारात बसून लोकांचे भविष्य सांगत असे. त्याचा धंदा अगदी छान चालला होता. ज्योतिष ऐकण्यासाठी त्याच्याकडे लोकांची नेहमीच गर्दी असे. त्यातून त्याला पैसाही बरा मिळे. लोकांचा त्याच्या ज्योतिषावर विश्वास होता. त्यामुळे त्याच्याकडील गिर्हाईकही वाढत चालले होते.
एका दिवसाची गोष्ट. तो एका इसमाचे ज्योतिष सांगण्यात गुंतला असतानाच त्याच्या शेजारी त्याच्याकडे धावत आला आणि म्हणाला, ”ज्योतिषीभाऊ, अहो तुमचं घर चोरांनी फोडलं आणि त्यातलं सगळं लुटून नेलं. चला, पळा लवकर.” शेजार्याचे बोलणे ऐकूण घाबरलेल्या ज्योतिषाने आपले सामान लगबगीने गोळा केले आणि तो घरी जायला निघाला. न राहून ज्योतिष विचारायला आलेल्या एका इसमाने त्याला विचारले,
”ज्योतिषीभाऊ, मला तुमचं आश्चर्य वाटतंय्. तुम्ही दुसर्यांच ज्योतिष सांगता आणि ते खरंही असतं. मग तुमच्या घरी चोरी होणार आहे, हे तुम्हाला अगोदर कसं नाही कळलं?”
”अहो कसं कळणार! मी दुसर्यांच ज्योतिष सांगतो त्याबद्दल मला पैसे मिळतात. स्वत:चं ज्योतिष पाहून मला थोडेच पैसे मिळणार होते? म्हणून मी ते पाहिलंच नाही बघा. कधी कधी असंच होतं. आपल्या व्यवसायाचा इतरांना फायदा होतो. मात्र स्वत:च्या कुटुंबाला त्याचा फायदा होत नाही. माझं तसंच झांलय्.”
ससा आणि चिमणा | Sasa aani Chimana Marathi Katha
Sasa aani Chimana Marathi Katha |
एका जंगलातील झाडावर एक चिमणा रहात होता. त्याला आपल्या सोबत्यांकडून कळले की बाजूच्या प्रदेशात उत्तम पीक आले आहे. त्यामुळे भरपूर खाणे मिळण्याच्या आशेने तो चिमणा इतर सोबत्यांबरोबर बाजूच्या प्रदेशात गेला. तिकडचे भरपूर खाणे बघित्लयावर घरी परतण्याची त्याला आठवणही येत नाही. चिमणा बरेच दिसव या प्रदेशात रहातो.
इकडे चिमण्यच्या रिकाम्या घरट्यात एक ससा येऊन राहतो. काहीदिवसांनी धष्टपुष्ट झालेला चिमणा आपल्या घराच्या ओढीने परत येतो. तेव्हा आपल्या घरट्यात सशाला बघून तो म्हणतो, ”चालता हो इथून! दुसर्याच्या घरात शिरताना तुला लाज वाटली नाही?
”उगीच मला कशाला शिव्या घालतोस? हे घर माझे आहे!” ससा शांतपणे उत्तरतो.
”माझ्या घरात घुसून मलाच हुसकवतोस काय?” चिमणा रागाने बोलतो.
त्याबरोबर ससा त्याला समजावतो, ”हे बघ… विहीर, तळे, झाड हे एकदा सोडून गेल्यावर त्यावर थोडीच आपली मालकी सांगता येते?”
तेव्हा चिमणा म्हणतो,”आपण एखाद्या धर्मपंडिताकडे जाऊन त्यास या वादावर निकाल देण्यास सांगू!” ससा या गोष्टीस तयार होतो.
त्या झाडापासूनच काही अंतरावर या दोघांचे भांडण ऐकत होते. रानमांजरासमोर येताच रानमांजराने प्रवचन सुरू केले, ”संसारात अर्थ नाही. घरदार, बायकामुले हे सर्व काही क्षणभंगुर आहे. धर्मच माणसाचा आदार आहे.”
ससा त्या रानमांजराचे प्रवचन ऐकून चिमण्यास सांगतो की, ”हा कोणी धर्मपंडित दिसतोय. त्यालाच न्यायनिवाडा करण्यास सांगूया!”
”पण हा तर आपला जन्मजात वैरी आहे… म्हणून आपण लांबूनच न्याय करायला सांगू!” चिमणा सशाला सांगतो.
मग दोघेजण त्याला लांबूनच सांगतात, ”पंडितजी! आमच्या दोघांत रहाण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. आपल्या शास्त्रानुसार आम्हाला न्याय द्या. आमच्यापैकी जो खोटा ठरेल त्याला आपण खावे.”
पंडित रानमांजर या बोलण्यावर ताबडतोब उत्तरते, ”छे! छे! हिंसेसारखे दुसरे पाप नाही! मी तुम्हाला न्याय देईन. पण खोटा ठरेल त्यास मी खाऊ शकत नाही… हे पाप माझ्या हातून होणार नाही. मला हल्ली म्हातारपणामुळे नीट ऐकायला येत नाही. तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते जवळ येऊन सांगा बघू!”
रानमांजराच्या या धूर्त बोलण्यावर िचमणा व ससा विश्वास ठेवतात आणि अगदी जवळ जाऊन बसतात. त्याबरोबर चिमण्याला पंजा मारून व सशाला दातांनी पकडून ते रानमांजर चट्टामट्टा करते
तात्पर्य: शहाण्या माणसाने विश्वासघात आणि धूर्त माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.
मूर्खाला उपदेश केला तर | Murkhala Updesh kela tar Katha
Murkhala Updesh kela tar Katha |
एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता. कुडकुडणार्या वानराला बघून त्याने म्हटले, ‘अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी आली नसती तुझ्यावर.’
‘माणसासारखे हात-पाय आहेत मला, पण..’ वानर कुरकुरला, पण माणसासारखी कामगिरी आम्हाला कुठली जमायला? आमचे डोके तेवढे नाही काम करत.’
‘त्याचे काय आहे..’ पक्षी बोलला, ‘ज्याचे मन चंचल असते, जो दुसर्याच्या कुचेष्टा करण्यात वेळ दवडतो, त्याच्या हातून विधायक स्वरूपाचे काम होत नाही. यासाठीच दुसर्याला त्रास देण्याची प्रवृत्ती तू सोडून द्यायला हवीस. मग जिद्दीने, चिकाटीने स्वत:च्या निवार्यासाठी घरकुल बांधता येईल तुला.’
उपदेश ऐकायची सवय नसलेल्या वानराला आला वैताग. तो चिडून, दात विचकत बोलला, ‘घरट्यात बसून मारे उपदेश करायला काय जाते तुझे? तू समजतोस कोण स्वत:ला? थांब, माझा इंगाच दाखवतो तुला.’
आणि झरझर झाडावर चढून त्या वानराने पक्ष्याचे घरटेच विस्कटून टाकले. दुष्ट स्वभावाच्या मूर्खाला आपण उपदेश करीत बसलो, म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवला. हे तो पक्षी जाणून चुकला आणि ‘स्वत:चं घर करवत नाही अन् दुसर्याने बनवलेले बघवत नाही,’ असे मनाशी म्हणत तो पक्षी दूर उडून गेला.
वेळेचे महत्त्व | Veleche Mahatva Marathi Katha
Veleche Mahatva Marathi Katha |
ईशान नेहमीप्रमाणे उशीरा उठला. त्यामुळे सकाळची आवश्यक कामे त्याला घाईने आवरायला लागली. इतक्यात स्कूलबसचा हॉर्न ऐकू आला. “अगं आई, मला ‘टू नंबरला’ लागली आहे” ईशान काकूळतीला येऊन म्हणाला. “अरे केवढा उशीर झाला आहे, आता शाळेतच टॉयलेटला जा.” आई म्हणाली.
शाळेच्या रस्त्यावर खूपच रहदारी असल्यामुळे शाळेत पोहोचायला उशीर झाला. ईशान शाळेत पोहोचला तेंव्हा प्रार्थना होऊन वर्ग भरले होते. त्यामुळे टॉयलेटला न जाता त्याला सरळ वर्गात जावे लागले. जोशी टिचर अफ्रिकेचा धडा शिकवत होत्या. “मुलांनो, अफ्रिकेत रहाणार्या मांजरीसारख्या दिसणार्या मोठया प्राण्याचे नाव कोणी सांगू शकेल काय?” ईशानने अभावितपणे हात वर केला. सगळा वर्ग ईशानकडे उत्सुकतेने पाहू लागला. ईशान बिचारा दोन्ही पाय एकमेकांवर ठेऊन म्हणाला, “टीचर मी टॉयलेटला जाऊ?” टीचर रागावून म्हणाल्या, “मी सिंह ऐकलाय, वाघ ऐकलाय पण टॉयलेट कुठे ऐकला नाही. गप्प खाली बस.”
थोडयावेळाने छोटी मधली सुट्टी झाली. सारी मुले वर्गातून बाहेर पळत गेली. तुम्हाला माहितीये ना इमर्जन्सी असल्यावर धावणे किती अवघड होतं ते. दोन्ही पाय व पोट आवळून ईशान टॉयलेट पर्यंत पोहोचला तर भली मोठी रांग. त्याचा नंबर येईपर्यंत सुट्टी संपल्याची घंटा झाली सुध्दा. त्यामुळे ईशानला काही न करताच परत यावे लागले.
ईशानचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. जिम्नॅस्टीकच्या तासाला उडया मारणे कठीण गेले. संगीताच्या तासाला सगळेच सूर बेसूर भासले. आवडत्या हिंदीच्या तासाला सुध्दा लक्ष लागले नाही. आता चित्रकलेचा शेवटचा तास चालू होता. एरवी रंगांशी मनसोक्त खेळायला, त्यांच्यात रमायला ईशानला खूप आवडायचं. पण आज मात्र ब्रश हातात पकडण सुध्दा कठीण जात होतं. त्याची अस्वस्थता मंजिरी टीचरच्या लक्षात आली. “ईशान, काही हवयं का?” टीचरेने विचारले. ईशान रडवेला होऊन म्हणाला, “टीचर मला खूप जोरात टॉयलेटला लागलीये हो. मी जाऊ का?” टीचर म्हणाल्या, “अरे आधीच नाही का सांगायचे. आधी जाऊन ये बर”
ईशान टॉयलेटला जाऊन आल्यावर टीचरने त्याला दिवसभर काय घडल्याचे विचारले. ऐकल्यावर टीचर वर्गाला उद्देशून म्हणाल्या, “मुलांनो वेळेच्या आधी थोडे लवकर उठून आपण दिवसाची सुरूवात केली पाहिजे. आपला रोजचा सकाळचा दिनक्रम जसे की अंघोळ, टॉयलेट, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच पण घाई न होता दिवसाची सुरूवात चांगली होते. दिवस अस्वस्थतेत जात नाही. मग उठणार ना उद्यापासून लवकर?”
सगळ्या मुलांनी मोठयाने होsss म्हटले.
व्यायामाचे महत्त्व | Vyayamache Mahatva Marathi Katha
Vyayamache Mahatva Marathi Katha |
विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने ‘हुर्रे’ ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली.
सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ”मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे.” मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना ” हर हर महादेव” म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते.
जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली.
संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ”आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? ” मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या.
टिचरांनी कारण समजावत सांगितले, “विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल”. “कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? “मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.
कोंबडी आणि पिल्लू | Kombadi aani pillu Marathi Katha
Kombadi aani pillu Marathi Katha |
एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.
हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्या शेतात असणार्या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.
एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय… एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! ” कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार “!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !
पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं… ! पिल्लू बाहेर येईना.
मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, ” पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. ” तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !
आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, ” पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! ” अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. ” खूपच हट्टी दिसतंय पिल्लू ” असं म्हणून बसून राहिली.
थोड्या वेळाने तिला वाटले,” किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. ” मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ‘ पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. ” पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.
अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्या दिवशी पण अंडे तस्सेच !
कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.
सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. ” सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? ” कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. 🙂
हत्ती व डास यांच लग्न | Hatti va Das yanche Lagn Marathi Katha
Hatti va Das yanche Lagn Marathi Katha |
एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला…. का? …. …. सांगा सांगा का? अहो, ते म्हणाले, ”बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!” तरीही, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला… … का? … … विचार करा… अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री ‘गुडनाइट’ लावून झोपायची सवय होती!!!!
इमानदारी हीच खरी कसोटी | Imandari hich Khari Kasoti marathi kahani
Imandari hich Khari Kasoti marathi kahani |
एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे.
त्याचप्रमाणे तो आपल्या वर्गशिक्षिकाच्या घरची छोटी छोटी कामे करत असे. त्यामुळे शिक्षकांना त्याच्या बद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते वह्या, पुस्तके देत असत. दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले, ”अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल” पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला. त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते. त्यानीच आपले पोट कसे बसे भरत. मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार?
आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले. दिनू सारखा विचार करू लागला. असे होतात तोच शिक्षक म्हणाले, ”आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे.” दिनू म्हणाला, ”गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो.” गुरुजी म्हणाले ठीक आहे. उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा.” असे आवर्जून गुरुजीने सांगितले. ”ते पुस्तक तू वाच.” दिनूने घाई घाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला. वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय? त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला. त्या पुस्तकात चक्क 500 रुपयांची कोरी नोट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. अरे पण मी तर पुस्तकात 500 रुपयांची नोट ठेवलेली नव्हती. मग कोठून आली ही नोट! तो विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की, ही नोट नक्की गुरुजींची आहे. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरुजींचे आहेत. पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत. असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला. पण त्याच्या मनात आले की, या पेश्याने स्कॉलरशिपची फी भरता येईल. कपडे, पुस्तके, आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील. हे आपणांस फारच उपयोगी आहेत. पण, ‘हे पैसे आपले नाहीत.’ तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला.
गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते. तो तेथे दिनू पोहोचला. दिनू म्हणाला, ”गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात 500 रुपयाची नोट होती. ती आपली नोट आहे. ही घ्या.” गुरुजी म्हणाले, ”धन्यवाद दिनू.” एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवेले असते. तुझी अशी परिस्थिती त्यात तु फीचा अजिबात विचार केला नाहीस. तू ताबडतोब 500ची नोट माझ्याकडे घेऊन आलास. खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस. हे आज मला कळले”. शाब्बास! दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी 500 रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती. त्या परीक्षेत तु उत्तीर्ण झालास. ‘धन्य तु दिनू”. असे आनंदाने उद्गगार गुरुजींनी काढले. कोणती परीक्षा गुरुजीँ ” दिनू म्हणाला. ”सत्त्वपरीक्षेत तू उत्तीर्ण झालास. ”असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले.” हे काय गुरुजी, हे काय करता, मला इनाम कशामुळे. तू शिक. चांगला शहाणा हो. परीक्षा देत राहा. तुला ही पुस्तके, वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती.
हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले. तो जोरात अभ्यास करू लागला. अन शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला. त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या. सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या. भाग्यवान दिनू. जो नेहमी सत्याने वागतो, प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते. ‘सत्याची कास धरा. सत्य कधीही लपत नसते.’
एकीचे बळ मोठे असते | Ekiche bal Marathi Katha
Ekiche bal Marathi Katha |
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे.
एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला.
सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.
सरळ रस्ता | Saral Rasta Marathi Story
Saral Rasta Marathi Story |
एकदा एका अरब व्यापार्याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले:
”बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?” उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला:
”मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.”
उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.
गोनूची गोष्ट | Gonuchi Gosth Marathi Katha
Gonuchi Gosth Marathi Katha |
मिथिला नगरीत राहणार्या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, ‘महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.’
शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, ‘गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?’
गोनू म्हणाला, ‘का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.’
आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.
स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.
तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा ‘आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.
आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला ‘तू हा चमत्कार कसा केलास?’ अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला १,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, ‘गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला १,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला ५00 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.’
एकलव्याची गोष्ट.. | Eklavyachi Gosth Marathi Story
आषाढातील पौर्णिमेस ‘गुरूपौर्णिमा’ म्हणतात. गुरूंच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरूंच्या प्रति निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भगवान वेदव्यास हे फक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक व महान शास्त्रज्ञ होते.
आपल्या भारतवर्षामघ्ये ‘नमोस्तुते व्यास विशालबुध्दे।’ असे म्हणून, या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात. अशा व्यासांच्या असामान्य प्रतिभेने शब्दांकित झालेले महाभारत… असं म्हणतात की या जगात अशी कुठलीही घटना, कथा, वा वेदना नाही, जिचा उल्लेख महाभारतामध्ये झालेला नाही.
वेदविद्या पारंगत महर्षी द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अतुलनीय ज्ञान आणि युध्दतंत्र याकरिता महर्षी द्रोणाचार्यांची ख्याती होती. एकलव्य हा एका आदिवासी पुत्र. द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. एकलव्याच्या शब्दांत त्याची कैफियत पुढे मांडली आहे.
मी एकलव्य…
तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले. होय, गुरू द्रोणाचार्य. उत्कृष्ट शिक्षक,शस्त्रहाताळणीमध्ये निपुण, विशाल ज्ञान आणि विद्वत्ता यांचा जणू सागर. त्यांच्या चेह-यावरचं तेज तर सदैव मनाला टवटवी देणारं आहे. गुरूजी, मी सदैव तुमचा आहे. सदैव तुमचा राहीन.
होय. मी भिल्लाचा पोर आहे. मला तुमच्या ऋचा ठाऊक नाहीत. ठाऊक आहे, वनात बागडणं. मनसोक्त गीते गाणं, पोहणं आणि त-हेत-हेची फळं औषधी यांचे जतन करणं… झाडांवर प्रेम करणं… माझं धनुष्य, बाण आणि बाणांचा भाता हाच एकमात्र माझा आग्रह/हट्ट, जिव्हाळा आणि ध्येय…
हे असं नेहमीच घडतं. प्रस्थापितांचं संरक्षण. त्यांची कोडकौतुके पुरविली जाणं हा तर रिवाज आहे. पण मी देखील एक उत्तम धनुर्धारी आहे, माझेही काही हक्क आहेत. हे या राजकुमारांच्या मांदियाळीमध्ये कोण लक्षात ठेवणार? मला काय हवं होतं? फक्त विद्या हवी होती. तुमच्याचकडून मला धनुर्विद्या शिकायची होती. हीन कुळातील म्हणून तुम्ही माझा अव्हेर केलात. तुम्हाला अर्जुन फार प्रिय होता…
तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी धनुर्विद्या देण्याला तुम्ही नकार दिलात. मला रडता आलं असतं. राग धरता आला असता. चिडचिड करता आली असती. नाहीतरी अरण्यात राहणा-या मुलाचा दंगा म्हणून सोडून दिलं असतं सा-यांनीच माझं वागणं.
पण मला सुचला एक सुंदर विचार. एक ठाम प्रकाश त्या विचाराबरोबर वाहात वाहात आला माझ्या मनात. नदीच्या झुळणुळणा-या पाण्यातून. वा-यांच्या तालातून आणि मनाच्या खोल आतल्या गाभ्यातून.
विचार असा होता, की जर तुम्ही माझे आहात, जर मी तुम्हाला पाहू शकतो, अशी भावना करू शकतो की तुम्हीच मला सर्वोत्तम, उच्चतम धनुर्विद्या शिकवत आहात, तर ती शिकवणी किती आगळीवेगळी किती थोर असेल! तुमचे अस्तित्त्व माझ्या मनात कायम होते. निराश होणं कधी मंजूर नव्हतंच. हारही मानायची नव्हती. मग काय उठलो. जिद्द आशा यांच्या प्रवाहात अंगांग न्हाऊन काढलं. आणि पर्णकुटीपाशी आलो. तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक एक पैलू आठवत राहीलो. ते पैलू मातीच्या मूर्तीमध्ये सामावून जावेत म्हणून घडत राहीलो. घडवत राहीलो… धनुष्य, प्रत्यंचा, बाण, माती, तुमची मूर्ती आणि स्वत:ला सुध्दा…
मग हे रोजचंच झालं. गुरूदेव आपलं गुरूकुल म्हणजे ही पर्णकुटी. आणि मोकळं मैदान, जंगलं ही आपली पाठशाळा. सतत सराव. निधिध्यास. दिवस रात्र केलेलं चिंतन. नेमबाजी, उंचावरील वस्तूचा अचूक वेध घेणे. आकाशातून, चल असताना नेम साधणं, स्वप्नांच्या चांदण्यांनी डवरून जायचं माझं मन. सभोवतीचं आवार, तुमचा पुतळा आणि आसमंतात भरून येणारी रात्र. बस निघालो. करत राहीलो. चालत राहीलो… किती, कसा, कधी, काहीच कळलं नाही.
मग मात्र एक दिवस ‘माझा’ आला. सारे विद्यार्थी, राजे रजवाडे, गुरूजन यांना थक्क करून टाकणारे धनुर्विद्येचं प्रदर्शन त्या दिवशी घडलं. ते मी करत होतो. आणि सारे तथाकथित निपुण लोक पाहात होते. ही करामत फक्त गुरूंचा आशीर्वादच करू शकतो, हे यांना कोण सांगणार? सातत्य, साधना आणि चिंतन यांची ती बीजे होती. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, मी मागीतलाही नसताना एक दिवस ‘माझा’ आला.
माझ्या जयकाराने व माझ्या नावाच्या उच्चाराने, कौतुकाने सारा आसमंत भरून गेला.तुम्ही आश्चर्यचकित होऊन विचारलंत मला, की कोणाकडे ही विद्या शिकलास? मी तुम्हाला आदराने वंदन केले. पर्णकुटीच्या मागील परसात घेऊन गेलो. तुम्ही पाहिलीत तिथे तुमचीच प्रतिमा. स्वत:च्याच पुतळयाकडे पाहून तुमच्या नयनांतून घळघळ अश्रू ओघळले. मला मुक्त कंठाने, मनापासून आशीर्वाद दिलात, तो दिवस माझा होता…
नंतर मग काय झालं, कुणास ठाऊक? पण गुरूदक्षिणा द्यायची व मागायची वेळ आली. आणि मी तर सांगितलं की काहीही मागा. तुम्ही मात्र मागितलात, माझ्या उजव्या हाताचा अंगठा! तुम्हाला ठाऊक नाही असे नाही. अंगठयाशिवाय धनुर्धारी कसा काय सर्वश्रेष्ठ ठरणार. माझ्या खूप गोष्टी कानावर आल्या. अर्जुनाला कुणीही स्पर्धक राहू नये, तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असावा, यासाठी तुम्ही असं केलंत… असेलही… पण खरं सांगतो गुरूदेव, मी लागलीच तुमची गुरूदक्षिणा दिली. तेंव्हा मी मोकळा झालो, आणि तुम्ही मात्र अडकलात. पाप-पुण्यांच्या दुष्टचक्रात. राजनीतीच्या अन्यायी सापळयांत. मला खरोखरी कींव वाटली तुमची. अन्याय नाही वाटला. गुरूंनी मागितलेल्या गोष्टीचा अन्याय वाटला, तर तो खरा शिष्य असतो का? तुम्ही मला धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिलात, त्या दिवशी संताप वाटला. असं वाटलं, का मी हीन कुळातला आहे? पण जेंव्हा तुम्ही अंगठा मागितलात ना, तेंव्हा मला सामोरं आलंच नाही, कुठलंही द्वंद्व. कुठलेही प्रश्न. किंवा कुठल्याही समस्या. अहो,कारण सोपं आहे. आधी माझ्याकडे काहीच नव्हतं, देण्यासारखं, आणि आता इतकी पुण्याई गाठवली की, तुम्ही मागितलंत ते मी देऊ केलं. देऊ शकलो. माझ्याकडे देण्यासारखं काहीतरी होतं. आजही आहे…
टाळून टळण्यातला शिष्य मी नाही. मला टाळलंत, पण शेवटी येणा-या पिढया जेंव्हा जेंव्हा एकलव्याचे नाव घेतील तेंव्हा तेंव्हा त्यांना गुरू द्रोणाचार्य जरूर आठवतील. आणि प्रत्येक धनुर्धा-याच्या अंगठयाने मीच पुढे चालवत राहीन, हा घेतलेला वसा. तुम्ही मला शुभाशिर्वाद द्या, गुरूदेव…
‘महाभारतातील पात्रांचे एक वैशिष्टय म्हणजे, प्रत्येकाला अन्याय झेलावा लागला आहे. घरच्या गरिबीमुळे आपला मुलगा अश्वत्थामा याला पीठाचे पाणी दूध म्हणून गुरू द्रोण यांना पाजावे लागले. मनोमन अर्जुनाला वरूनही द्रौपदीला पाच पतींशी संसार करावा लागला आहे. यात कृष्ण आणि विदूर यांना मात्र कायम समतोल राखता आला…
अन्यायाला हसत हसत सामोरा जाणारा आणि जीवनापेक्षाही भव्य असा एकलव्य आजही आपल्या स्मृतीमध्ये हुरूप उत्साह, कष्टांचा पायंडा आणि एक ठसठस बनून राहीला आहे.
सुई आणि वाघ | Sui ani Wagh Marathi Katha
Sui ani Wagh Marathi Katha |
एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, ‘सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?’
सुई म्हणते, ‘हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. ‘सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?
विंचवाला सुई म्हणते… ‘हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.
‘सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?
सुई म्हणते ‘हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.
सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.
थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.
शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.
घामाचा पैसा | Ghamacha Paisa Marathi Katha
Ghamacha Paisa Marathi Katha |
धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल’ मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली.
पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोनदिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’ शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
चल रे भोपळया टुणुक टुणुक | Chal re bhoplya tunuk tunuk Marathi Katha
Chal re bhoplya tunuk tunuk Marathi Katha |
एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली.
खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.
अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.
बुड घागरी | Bud Ghagari Marathi Katha
Bud Ghagari Marathi Katha |
तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणतो दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’
मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.
गर्वाचे घर खाली | Garvache Ghar khali Marathi Gosth
Garvache Ghar khali Marathi Gosth |
धुक्याच्या जाड पडद्याआड सर्व जंगल लपले होते. झाडांचे आकार, पशुपक्ष्यांची चाहूलही कुठे जाणवत नव्हती. नाही म्हणायला खळखळत जाणारा एक झरा मात्र काहीतरी किलबिलत होता. हळूहळू समोरच्या उंच कडयाआडून सूर्याचे किरण डोकावू लागले. वातावरण ऊबदार झाले तशी धुक्याने काढता पाय घेतला. सादळलेली झाडे उन्हामुळे तजेलदार दिसू लागली. पक्षीही चिवचिवाट करीत आपला आनंद व्यक्त करू लागले.
हळूहळू उन्हे तापली. अन् गारठलेले जंगल पूर्ववत् झाले. झाडे फांद्या हलवत एकमेकांशी गप्पा मारू लागली. इतक्यात वारा तिथे आला. वारा येताच झाडे उल्हसित झाली. आनंदाने डोलू लागली. पण वारा मात्र आज मुळीच खूष नव्हता. बराच वेळ मनधरणी केल्यावर तो म्हणाला, ‘हा डोंगराचा उंच कडा आहे ना तो फार गर्विष्ठ आहे. मला कायम अडवून ठेवतो. सूर्यालासुध्दा लवकर वर येऊ देत नाही.’ ‘हो रे बाबा खरंच!’ झाडांनी मान डोलावली. ‘पण आपण करणार तरी काय?’
‘आपण त्याला सांगायचे जरा ऐसपैस पसर म्हणून माझ्यासारखा?’ , झरा किणकिणला.
मग सर्वांनी त्या उंच कडयाला हाका मारल्या. पण तो आकाशात मान ताठ ठेऊन उभा होता. त्याने नजर वळवूनसुध्दा खाली बघितले नाही. मग वार्याने उंच झेप घेतली. त्याच्या कानापाशी जाऊन तो गुणगुणला. ‘तुझ्या अवाढव्य उंचीमुळे सर्व प्राणीमात्रांना फार त्रास होतो आहे, तरी जरा इतरांकडे लक्ष देशील कां?
‘का म्हणून? माझ्या अफाट उंचीचा तुम्हाला त्रास व्हायचं कारण काय? उलट माझ्यामुळे पाऊस पडतो. हे तृषार्त जंगल आबाद रहातं. ह्या सपाटीवरही मी कसा उठून दिसतो. लोक म्हणतात ‘काय उत्तुंग कडा आहे. खरोखर हा जिंकणे कठीण!’ अहो, आजपर्यंत भल्याभल्यांनी हात टेकलेत म्हंटलं माझ्यापुढे!’ आकाशात रोखलेली आपली नजर जराही न हलवता कडा बोलला… त्या गडगडाटाने सर्व प्राणीमात्र भयभीत झाले. वाराही क्षीण होऊन खाली खाली येऊ लागला.
हळूहळू हिवाळयाने काढता पाय घेतला व सूर्याने डोळे वटारले. सर्व आसमंत रणरणत्या उन्हात भाजून निघाला. जंगलाच्या छायेला सर्व प्राणीमात्र धावले. त्याचे हिरवे छत्र सर्वांना सुखदायी ठरले.
इकडे पर्वतही तप्त झाला होता. त्याच्या अंगाची काहिली होत होती. बेडरपणे सूर्यकिरणे अंगावर झेलताना शरीर विदीर्ण होत होते. पण त्याचा ताठरपणा जराही कमी झाला नव्हता.
पुन्हा काही दिवसांनी वार्याची सळसळ जाणवू लागली. काळया ढगांनी आकाश भरले. धुंवाधार पाऊस पडू लागला. पर्वताच्या अंगाखांद्यावर ढग बागडू लागले. त्यात तो दिसेनासा झाला.
‘हा पाऊस माझ्यामुळे पडतो. ह्या पिसाट वार्याला मी वठणीवर आणतो. हा आसमंत माझ्यामुळे हिरवागार रहातो’, पुन्हा त्याने सर्वांना ओरडून सांगितले. पण विजेच्या गडगडाटात ते कुणाला ऐकू गेले नाही.
डोंगरावर खळखळत वहाणारे निर्झर , दरीत उडया घेणारे धबधबे सर्वजण जंगलाच्या आश्रयाला येत होते. कारण त्यांना जवळ बाळगण्याची माया पर्वताजवळ नव्हती. जंगल मात्र मोठया प्रेमाने सर्वांना सामावून घेत होते. तिथे एक विस्तीर्ण सरोवरच निर्माण झाले होते. डोंगरावरून रोरावत येणारे प्रवाह जंगलाची सीमा ओलांडताच शांतपणे झुळझुळू लागत. त्यांच्यातून गोड नाद निघे. आकाशात घोंगावणारा वारा उंच कडयाला म्हणाला, ‘एवढे ढग तुझ्याभोवती गोळा होतात पण खरा जलसंचय कुणाजवळ आहे तर पायथ्याच्या जंगलाकडे!
तुझ्याजवळ रहायला कुणीच तयार नाही.’
‘त्याची फिकीर मी करीत नाही. कारण ते माझ्या योग्यतेचे नाहीत. म्हणून मीच त्यांना झटकून टाकतो.’ डोंगराने उत्तर दिले.
इकडे आसमंतात लवलवणार्या विजांनी त्याचे बोलणे ऐकले व चारी दिशांनी त्याच्यावर झेप घेतली. कानठळया बसवणारा आवाज झाला, लखलखत्या प्रकाशाने डोळे दिपले. प्रचंड गडगडाटाने बेसावध झालेल्या सर्वांनी जेव्हां हळूच डोळे उघडले तेव्हां त्या उंच कडयाचा कुठे मागमूसही नव्हता. दरीच्या खोलीत तो केव्हांच विसावला होता.
डोंगरापलीकडून वहाणारा वारा आज झुळझुळत जंगलात शिरला. कारण त्याला अटकाव करायला कुणीच नव्हते. आकाश आता निरभ्र झाले होते. पिवळीधम्मक सूर्यकिरणे क्षितिजापर्यंत रेंगाळत होती. अन पानापानातून जंगलही सर्वांशी बोलत होते.!!
शहाणी नीतू | Shahani Nitu Story in Marathi
Shahani Nitu Story in Marathi |
नीतूकडे अनेक खेळणी होती.छोटया बाहुल्या,बार्बी डॉल्स,भातुकली,गाडया आणि मोठी लाल रंगाची कार ज्यात बसून नीतूला छानपैकी फिरता यायचे.नीतूच्या मैत्रिणींनाही तिचीही गाडी खूप आवडायची.गाडीत बसण्यासाठी अनेकदा भांडणेही व्हायची.काही दिवसांनी नीतूची मैत्रिण शामलीने लाल रंगाची नवीन स्कूटर आणली.एक पाय स्कूटरवर आणि एक जमिनीवर ठेऊन ही स्कूटर चालवली की काय वेगाने चालायची.सगळ्या मुली बघतच राहत.नीतूला ह्या स्कूटर समोर आपली कार अगदी साधी वाटत होती.आपल्याकडेही कार ऐवजी स्कूटर असती तर बरं झाले असते असे नीतूला वाटले.घरी आल्यावरही तिच्या डोक्यात तोच विचार होता.संध्याकाळी बागेत खेळण्याऐवजी नीतू आपल्या कारजवळच विचार करत बसली.तिच्या डोक्यातून स्कूटरचे भूत काही गेले नव्हते.रात्री जेवायच्यावेळी आईने नीतूच्या आवडीचा पुलाव आणि रायते केले होते तरी तिचे जेवणात अजिबात लक्ष नव्हते.”काय झाले नीतूली,तुझे जेवणात अजिबात लक्ष नाहीये?”,आईने प्रेमाने भरवत तिला विचारले.”आई,आज शामलीच्या बाबांनी तिच्यासाठी मोठी लाल स्कूटर आणली.आपल्या कारपेक्षाही खूप छान.मलाही तशीच स्कूटर हवी आहे.घेऊन दे ना”,नीताने हटट केला.आईने सजावले,”नीतू,अगं प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेलच असे नाही.दुसर्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊच शकू असेही नाही.”
“अगं पण मला ती स्कूटर खूपच आवडली आहे म्हणून हवी आहे”,नीताने हटट केला.”नीता हटट न करणार्या,व्यस्थित जेवणार्या मुलांची इच्छा सहज पूर्ण होते.तूही तशीच वागलीस तर लवकरात लवकर तुझीही इच्छा अशीच पूर्ण होईल.” आईने समजावून सांगितले.आईचे बोलणे नीतूने व्यवस्थित लक्षात ठेवले आणि त्याप्रमाणेच शहाण्या मुलीसारखी वागू लागली.
होताहोता नीतूचा सहावा वाढदिवस आला.वाढदिवसाला तिचे सगळे मित्र मंडळी,आत्या आणि काकाही आला होता.आईने तिच्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक,इडली सांबार आणि शंकरपाळे केले होते.पार्टीत खूप मजा आली.नीतूला मात्र आश्चर्य वाटले की कुणीही तिला वाढदिवसाचे गिफ्ट दिले नाही.तिने हळूच जाऊन आईला विचारले.आई गालात हसत तिला गॅलरीत घेऊन आली.तिथे मोठया रंगीत कागदात काहीतरी गुंडाळले होते.”नीतू बघ,सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले आहे”,आई म्हणाली.नीतूने घाईने कागद बाजूला केला तर लाल स्कूटर!अगदी तिच्या मनात होती तशीच!
नीतूने आलेल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मोठयांना धन्यवाद दिले.आज नीतू खूपच आनंदात होती कारण तिच्या शहाण्यासारख्या वागण्यामुळे तिला तिच्या आवडीचे गिफ्ट मिळाले होते.
चांदोमामा | Chandomama Marathi Katha
Chandomama Marathi Katha |
फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेंव्हा फक्त सूर्यच आकाशात होता, चंद्र अजिबातच नव्हता. फक्त सूर्यच असल्यामुळे पृथ्वीवर कधी अंधारच होत नसे नेहमीच उजेड रहात असे. त्यामुळे पृथ्वीवर राहणारी माणसे सतत कामात असत. त्यांना विश्रांती कधी घ्यावी हे समजत नसे. सतत काम करत रहायल्यामुळे त्यांना थकवा येत असे. चिडचिड होत असे.
एकदा देवबाप्पाने पृथ्वीवरच्या माणसांची भेट घ्यायचे ठरवले. तो पृथ्वीवर आला तेंव्हा माणसे काम करत होती. देवाने माणसाला विचारले, ” तू तुझे हे शेत कधी नांगरले ?” माणूस उत्तरला, “आज”. देवाने दुसर्या माणसाला विचारले,” झाड लावण्यासाठी तू हा खड्डा कधी खणलास?” माणूस म्हणाला , “आज”. देवाने परत तिसर्या माणसाला विचारले,” झाडावरची ही फळ कधी पिकली?” तिसरा माणूस हसून म्हणाला,”आजच”. देवाला आश्चर्य वाटले. आणखीन खात्री करुन घेण्यासाठी त्याने आपल्या मुलाला घेऊन जाणा-या बाईला विचारले,”ह्याचा जन्म कधी झाला”. बाई कौतूकाने म्हणाली,”आज”.
हे ऐकल्यावर देवाला समजून चुकले की पृथ्वीवरच्या माणसांना वेळेचे अजिबातच भान नाहीये. त्यांना कधी कुठले काम करावे, किती वेळ करावे हे समजत नाही. त्यावर उपाय म्हणून देवाने सूर्याला बारा तासांनंतर अस्त व्हायला सांगितले आणि बरोबर बारा तासांनी परत उदय व्हायला सांगितले. आता पृथ्वीवर बारा तासांनी अंधार व्हायला लागला.
अंधारात लोकांना काही दिसेनासे झाले. धडपडू लागले. काहीच काम होईना म्हणून नाईलाजाने झोपू लागले. काही दिवसांनी चौकशी केल्यावर देवाच्या लक्षात आले की माणसांना संपूर्ण अंधाराची खूपच गैरसोय होते आहे. त्यांना थोडातरी प्रकाश पाहीजे. त्यासाठी मग त्याने शांत आणि शितल असणार्या चन्द्रदेवाला पृथ्वीवर येण्याची विनंती केली. पांढराशुभ्र चन्द्रप्रकाशात पृथ्वीवरच्या माणसांनाही शांत वाटू लागले. झोप येऊ लागली. माणसांचा वेळ रात्र आणि दिवस ह्यात वाटला गेला. अश्या तर्हेने पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस सूर्यासोबत कामात आणि रात्र चन्द्रासोबत आरामात जाऊ लागली.
आईचा दिवस | Aaicha Diwas Marathi Katha
मदर्स डेसाठी अदिती आणि आखिलेषची जोरदार तयारी चालू झाली होती. रोजच्या दोघांच्या चर्चा, कागदावर सारखे गुपचूप लिहीणे आजोबा दोनचार दिवसांपासून पाहात होते. आज त्यांनी त्याबद्दल मुलांना विचाराचे ठरवलेच. “काय गं आदिती, काय गडबड चालली आहे? दोन चार दिवसांपासून तुम्ही दोघेही काहीतरी कामात आहात?”. आजोबांनी हा प्रश्न विचारल्यावर आदितीने घाबरुन खोलीत आई नाही ना ह्याची खात्री करुन घेतली. “अहो आजोबा, मदर्स डे आहे नां त्याची तयारी करतो आहोत.” आखिलेषने दबक्या आवाजात सांगितले. “मदर्स डे म्हणजे आपला मातृदिन होय” आजोबा समजूतीने म्हणाले. “मातृदिन नाही हो आजोबा, ‘मदर्स डे’!
आम्ही त्याच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहोत.” आदितीने समजूत काढली. आखिलेष पुढे समजावत म्हणाला,” आजोबा मी इंटरनेटवर वाचले आहे मदर्स डेची सुरुवात प्रथम ग्रीक आणि रोमन लोकांनी ख्रिस्त जन्मपूर्व २५० वर्षांपूर्वी केली. निसर्गमातेचा उत्सव म्हणून सुरु केला गेलेला हा दिवस आपआपल्या मातांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. आता भारतीयही मातृदिना बरोबरच मदर्स डेही साजरा करतात. आम्हीही आईसाठी हा दिवस स्पेशल करणार आहोत.” आजोबांनाही ही माहिती नवीनच होती. पाश्चात्यांची प्रथा असली तरी आईसाठी मुले काम करता आहेत हे पाहून आजोबांना खूप आनंद झाला होता. ते उत्साहाने म्हणाले, “मुलांनो, मलाही तुमचा प्लॅन सांगा. मी सुध्दा तुम्हाला काहीतरी मदत करु शकेन”. आजोबांचे आश्वासन ऐकून मुलांनाही उत्साह आला.
आदिती सांगू लागली,” रविवारी आम्ही दोघेही आईच्या आधी उठून तिला सकाळचा चहा करुन देणार आहोत. त्यानंतर दुपारचे जेवणही आम्हीच करणार आहोत. बाबा आम्हाला पोळ्या करायला मदत करणार आहे.” आखिलेष पुढे म्हणाला,” आईसाठी आम्ही खास शुभेच्छापत्रही तयार केले आहे. साठवलेल्या पैश्यातून तिच्यासाठी छोटेसे गिफ्ट आणि आवडीचे मोगर्याचे गजरेही आणणार आहोत.” मुलांचे प्लॅन ऐकून आजोबा खूष झाले, “मुलांनो तुमचा मदर्स डे नक्कीच स्पेशल होणार आहे. मीही त्या दिवशी तुम्हाला कामात मदत करीन”. स्मार्ट कीड्स तुम्ही मदर्स डेच्या तयारीला लागला आहात ना?
काळजी दातांची | Kalaji Datachi Marathi Goshti
मोंटूचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त देशात परदेशात जात असत. मोंटूचा मामाही अमेरिकेत होता. त्यामुळे सतत मोंटूला चॉकलेटचे विविध प्रकार खायला मिळत. चॉकलेट खातांना त्याला मजा येत असे परंतु चूळ भरायला किंवा दात घासायला मोंटूला प्रचंड कंटाळा होता. हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागला. मोंटूचे वजन वाढायला लागले होते. त्याचे दात काळे होऊन किडायला लागले होते. कधी जर खूप थंड किंवा अती गरम पदार्थ खाल्ले तर त्याच्या दातातून कळा येत असत. अश्या वेळी त्याला अत्यंत रडू येत असे. आईबाबा त्याला ह्या गोष्टीवरुन खूप समजावत पण त्याला अजिबात समजावून घ्यायचे नसायचे.
एके दिवशी झोपलेला असतांना त्याला कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले परंतु कोणी दिसेना. थोडयावेळाने आवाज अधिक मोठा झाला. त्याने नीट कानोसा घेतल्यावर लक्षात आले की आवाज तर त्याच्या तोंडातून येत आहे. त्याला अजिबात कळेना म्हणून त्याने आरश्यासमोर आ sss करुन मोठे तोंड उघडले. तर चक्क त्याचे मागचे चार दात म्हणजेच दाढा रडत होत्या. “ऊं, ऊं, मोंटू तू आमची नीट काळजी न घेतल्यामुळे बघ काय झाले?”
“मी..मी कुठे काय केले”, मोंटू ओशाळून म्हणाला.
“हो तूच हे सगळे केलेस. रोज आठ-दहा चॉकलेट्स खायचास. खाल्ल्यावर चूळ भरायचा नाहीस. रात्री दात घासायचा नाहीस. सकाळचे तुझे दात घासणेही घाईचेच असते. त्यामुळे चॉकलेट आणि अन्नाचे सगळे कण आमच्या दातात अडकून रहातात. दिवसरात्र अडकून बसल्यामुळे आम्हाला किड लागली आहे. आमचा पांढराशुभ्र रंग तर काळाकुट्ट झाला आहे. ” दात रडत म्हणाले.
मोंटू दातांचे बोलणे ऐकून अधिकच ओशाळला. दात पुढे म्हणाले “आता तू कुठलाही गरम किंवा गार पदार्थ खाल्ला की आम्हाला किती त्रास होतो माहिती आहे का ? जोरदार ठणका बसतो. डॉक्टर काकांकडे गेल्यावर आता ते आम्हाला काढून टाकणार. तुझ्या हलगर्जीपणामुळे आमचे घर जाणार आहे. ऊं… ऊं… ऊं..”
“मोंटू अरे उठ, शाळेत जायची वेळ झाली आहे” आईची हाक आली.
मोंटू दचकून जागा झाला. “अरे म्हणजे हे फक्त स्वप्न होते तर”. मोंटूला अगदी हुश्श झाले. मात्र त्याने निश्चय केला दातांची काळजी घेण्याचा आणि दात घासायला बाथरुम मध्ये पळाला.
निसर्गाचे देणे | Nisargache Dene Moral Story in Marathi
मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत.
तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले,” बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?” मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले.
त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली.
आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली,” मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागवण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरवले आहेत. पण त्यासाठी निसर्गाची हानी मात्र अजिबात करायची नाही.” आईचे बोलणे ऐकून मिताने तिला अत्यानंदाने मिठी मारली.
नदीतला मासा व समुद्रातला मासा | Naditla masa va samudratla Masa Marathi Story
एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहून गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला, ‘देश, जात, कुळ या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा.’ त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला, ‘अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस. जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघंही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण ते कळेल. कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.
तात्पर्य – नुसत्या जात, कुळ यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते.
घुबड आणि लहानपाखरे | Ghubad aani lahan Palkhare Katha
एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, ‘तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस ? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !’
त्यावर घुबड म्हणाले, ‘अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.’
पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.
तात्पर्य – बैल गेला आणि झोपा केला !
कोल्हा आणि नाग | Kolha anai Naag Marathi Kath
एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीळ खणीत होता. खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला. त्याला पाहाताच कोल्ह्याला फार भीती वाटली. तो नम्रपणे नागास म्हणाला, ‘आजोबा, आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो.
पण आपण इथं जे रात्रंदिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं ?’ नाग त्यावर म्हणाला, ‘ बाबा, माझं नशीबच तसं त्याला काय करणार ?’ कोल्हा म्हणाला, ‘पण इथे खूप धन असूनही तुम्हाला चैन करताना मी पाहात नाही, किंवा आपण एक पैसासुद्धा कोणाला देत नाही. तर या धनाचा उपयोग काय?’ नाग म्हणाला, ‘ते मला समजत नाही. पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे. नशिबात असेल ते भोगल्यावाचून सुटका नाही.’ कोल्हा म्हणाला, ‘तर मग मी धनवान नाही हे देवाचे माझ्यावर मोठे उपकारच आहेत. कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी नसेल !’
भांडखोर मांजर | Bhandkhor Manjar Marathi story
दोन मांजरांनी एकदा खवा चोरून आणला पण त्याचे वाटे करण्यासाठी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. तेव्हा आपणास सारखे वाटे करून द्यावे अशी त्यांनी एका वानरास विनंती केली. वानराने ती विनंती मान्य केली व त्या खव्याचे दोन भाग करून ते तराजूच्या दोन्ही पारड्यात घातले. त्यापैकी एक भाग मोठा असल्यामुळे त्या बाजूचे पारडे खाली झाले. तेव्हा त्यातील बराच खवा तोंडात टाकून त्या वानराने तराजू पुन्हा उचलला, तो दुसरे पारडे खाली बसले. त्यातील आणखी बराच खवा तो घेत आहे इतक्यात ती मांजरे म्हणाली, ‘वानर दादा, आमची समजूत झाली, राहिलेला खवा आमचा आम्हाला द्या.’
वानर म्हणाला, ‘मूर्खांनो, तुमची समजूत झाली असेल पण न्यायदेवतेची समजूत झाली पाहिजे ना ? तुमचा खटला फार भानगडीचा असल्यामुळे तो इतक्या लवकर संपणार नाही.’ असे म्हणून दर वेळी तराजू उचलावा व प्रत्येक वेळी त्यातला खवा खावा असे त्याने चालवले होते. खवा अगदी थोडा राहिला असे पाहून ती मांजरे अगदी काकुळतीला येऊन त्या वानराला म्हणाली, ‘वानर दादा, आता राहिला आहे तेवढा खवा तरी आम्हाला द्या.’ वानर हसत म्हणाले, ‘मित्रांनो, माझ्या मेहनतीबद्दल मला काही बक्षीस नको का ?’ आणि उरलेला खवा त्याने चटकन तोंडात टाकला.
तात्पर्य – थोडेसे नुकसान सहन करून आपल्या भांडणाचा निकाल आपापसात करणे चांगले.
शिकारी, कोल्हा व वाघ | Shikari, Kolha va Wagh Marathi Katha
एका शिकार्याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले.
सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.
तात्पर्य – अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.
एक कुत्र्याची जोडी | Ek kutrchi Jodi Marathi Gosth
एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, ‘मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.’
तात्पर्य – एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांच्या सोयी पाहाव्या लागतात.
गाढव आणी निर्दय मालक | Gadhav aani nardayi Malak Marathi Katha
एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे.
असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला.
तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, ‘अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं. तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.’
तात्पर्य – काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत.
मुलगा आणि चणे | Mulaga aani Chane Marathi Katha
एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले. ते पाहून तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, ‘काय मूर्ख आहेत ते चणे. यांचं अंग भाजतं आहे आणि त्यांना गाणं सुचतं आहे.’
तात्पर्य – अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.
झाड आणी कुर्हाडीचा दांडा | Zad aani Kurhadicha Danda Katha
एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, ‘काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही कुर्हाड करते आहे ते काही चूक नाही. पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुर्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचं फार वाईट वाटतं.’
तात्पर्य – आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.
जिद्द | Jidd Marathi Katha
मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,”मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर”. आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला.
त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,”अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?”. त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले,” अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही.” वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले.
दुसर्या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले,” मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक.”
आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाला, ” हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही”
मैत्रीचे मोल | Maitriche Mol Marathi Katha
भुवनचे आईबाबा बंगलोर सारखे मोठे शहर सोडून चिकमगलूर सारख्या छोट्या गावी राहायला आले. बर्याच दिवसांपासून त्यांना शहरातले प्रदुषण, आवाज, धूळ आणि वेगवान आयुष्यापासून दूर शांततेत जगायचे होते. त्यांनी विचार केला आठ वर्षाच्या भुवनला ह्या छोटया गावात जुळवून घेणे सहज शक्य होईल. परंतु भुवनला मात्र त्याच्या नवीन शाळेचे मित्र अजिबात आवडले नव्हते. बंगलोरच्या शाळेचे मित्र अत्यंत स्मार्ट होते. नवीन गावातल्या शाळेचे मित्र मात्र त्याला इतके स्मार्ट वाटत नसत.
ही मुले इंग्रजीत न बोलता सतत आपल्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडात बोलत आणि डब्यात दहीभात आणत असत. भुवन त्या मुलांपासून अलिप्त राहात असे त्यामुळे वर्गातली मुले त्याच्याशी बोलायला उत्सुक नसत. भुवनला त्यांच्या सारखे झाडावर चढणे, मोठयांची सायकल चालवणे व गावाकडचे खेळ खेळणे अजिबात जमत नसे. वर्गातही अभ्यास करतांना भुवन सतत शिक्षकांच्या पुढे पुढे करायचा त्यामुळे वर्गातली इतर मुले त्याला आपल्यापेक्षा हुशार आणि वेगळी समजत असत. अश्यामुळे शाळेत येऊन इतके दिवस झाले तरी त्याला कुणीच मित्र मिळाले नव्हते. भुवन अगदी एकटा पडला होता.
एके दिवशी तो असाच उदास बसला होता. “माझ्याशी कोणी मैत्री का करत नाही?”, “मला कुणीच खेळायलाही बोलवत नाही”, “ह्या गावात येऊन मी अगदी एकटा पडलो आहे” असे म्हणतांना भुवनला अगदी रडू येत होते. असे म्हणत असतांनाच त्याच्या टेबलवर एक पिवळा-नारिंगी प्रकाश भुवनला दिसला. त्या पाठोपाठ डोक्यावर सोनेरी मुकूट घातलेली दीड फूट उंचीची छोटी परी अवतरली. भुवन रडणे थांबवून तिच्याकडे पाहू लागला. परी म्हणाली,” भुवनबाळा तुझे दुःख मी जाणते. सगळी मुले तुझ्याशी खेळायला लागतील. मैत्री करतील. मात्र त्यासाठी तुला बरेच बदलावे लागेल. आहेस तयार ह्या सार्यांसाठी”. भुवने आनंदाने आपली मान हलवली. तिने तथास्तु म्हटले.
दुसर्या दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. भुवनची चित्रकला उत्तमच होती. स्पर्धेसाठी खास त्याच्या बाबांनी त्याला नवीन रंगपेटी बक्षीस दिली होती. पण आज भुवने वेगळाच निश्चय केला होता. शाळेत गेल्याबरोबर त्याने चित्रकलेच्या वृंदा मॅडमला सांगितले की बर वाटत नसल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये. त्याने आपली नवीन रंगपेटीही वर्गातल्या मुलांना वापरायला दिली. वर्गातल्या मुलांना खूपच आश्चर्य वाटले.
मधल्या सुट्टीत भुवन वेगळा न बसता स्वतःहून मुलांच्या गोलात सामील झाला. आईने स्पर्धेच्या दिवसासाठी खास म्हणून डब्यात दिलेला पाईनऍपल केक सगळ्या मुलांना वाटला. सगळ्या मुलांनी मिटक्या मारत आणि भुवनच्या आईचे कौतूक करत केक संपवला. केक संपल्याचे भुवनला अजिबात वाईट वाटत नव्हते. उलट बदल म्हणून त्याने कविताने आणलेला दहीभात खाल्ला. इतक्यात आदित्य आणि ऋषी तेथे आले आणि म्हणाले,”भुवन तुझे टॅटू तू आमच्या कंपासमध्ये टाकलेस का?, आम्हाला कितीतरी दिवसांपासून ते हवे होते. धन्यवाद भुवन.” भुवनेही मान डोलावली पण त्याला माहीत होते की हे सारे छोटया परीने केले आहे. त्याने तिला मनोमन धन्यवाद दिले.
नंतर खेळाच्या तासाला राघव भुवनला मोठी सायकल चालविण्याचा आग्रह करत होता. “तुला वाटत मला हे जमेल?”, भुवनने भीतभीत त्याला विचारले. “हो का नाही. मी आहे ना तुला शिकवायला”, राघव आश्वासक आवाजात म्हणाला. भुवनने चक्क मोठी सायकल चालवून बघितली. थोडयाच वेळात भुवन सार्या मुलांबरोबर खेळत होता, मस्ती करत होता, हसत खिदळत होता. चिकमगलूरला आल्यापासून आजचा त्याचा दिवस खूपच आनंदात गेला होता. एका दिवसात अचानक त्याला खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या.
रात्री घरी जाऊन त्याने परीला बोलावले पण ती काही आली नाही. झोपल्यावर मात्र परी त्याच्या स्वप्नात आली. भुवनला म्हणाली,”भुवन आज तुला मी मुलांशी मैत्री करायला मदत केली. आता तू स्वतःहून मित्र जोडले पाहिजेस. तू गुणी मुलगा आहेसच परंतु सर्व मित्रांना मदत करायला आणि त्यांच्या बरोबर जुळवून घ्यायला तुला शिकलेच पाहीजे. त्यामुळेच तू सर्वात ‘बेस्ट’ होशील”. भुवन परीचे म्हणणे ऐकून स्वप्नातच मान डोलवत होता.
दुसर्यांना मदत | Dusaryanna Madat Marathi Katha
टीना तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणून तिचे सर्व लाड पुरवले जात होते. तिला कुठल्याही गोष्टीला नाही ऐकायची सवय नव्हती. मागितलेली गोष्ट मिळाली नाही की रडून घर डोक्यावर घेत असे. तिला कोणाशीच काही शेअर करायला आवडायचे नाही. खाऊ, पुस्तक, खेळ असे काही सुध्दा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करायची नाही. उलट त्यांच्याबर दादागिरी करायची. त्यामुळे टीनाला वर्गात एकही मित्रमैत्रिण नव्हते. हया गोष्टीचे टीनाच्या आईला खूप वाईट वाटायचे.
एकदा टीनाच्या वर्गात गौरी नावाची नवीन मुलगी आली. नवीन असल्यामुळे टीचरांनी तिला टीना शेजारी बसवले. टीना अर्थातच स्वत:हून तिच्याशी बोलायची नाही. पण गौरी मात्र तिच्याशी बोलायची आणि टीना सांगेल तसे वागायचीसुध्दा! परीक्षेत गणितात गौरी नापास झाली आणि टीनाला मात्र पैकीच्या पैकी मार्कस मिळाले. टीनाच्या आईला कळल्यावर आई म्हणाली ” टीना, अग तुला गौरीला मदत करायला हवी. तुला जर एखादी गोष्ट येत नसेल तर तू तिला समजावून सांगायला हवीस.” टीनाने आईकडे सरळ दुर्लक्ष केले. मग मात्र आईने सांगून टाकले, “जर टीना गौरीला मदत करणार नसेल तर तिला घरात कार्टून पाहता येणार नाही”. हे ऐकल्यावर नाईलाजाने टीनाने गौरीला मदत करायचे ठरवले. आता टीना गौरीला रोज गणित शिकवू लागली. रोजच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आणि पुढच्या परीक्षेत गौरीला गणितात उत्तम मार्कस मिळाले. गौरीने सर्व वर्गासमोर टीनाचे आभार मानले. पण टीनाला मात्र त्याचे काहीच वाटले नाही. तिने तर कार्टून बंद होईल हया भीतीने मदत केली होती ना !
निर्मळ मनाची गौरी टीनाला मदतीची परतफेड कशी करता येईल हयाची संधी शोधत होती. एकदा टीना आणि वर्गातल्या साहीलचे भांडण झाले. टीनाने त्याला ‘इडियट’ म्हटले. हे शब्द टीचरांनी ऐकल्यावर टीनाला शिक्षा म्हणून संपूर्ण शाळा झाडायला सांगितली. टीनाला तर रडूच फूटले. एवढी मोठी शाळा कशी झाडायची आणि घरी कधी जायचं? ह्याच काळजीत टीना होती. परंतु त्याचवेळेला गौरी टीनाच्या मदतीला आली. टीना आणि गौरीने संपूर्ण शाळा झाडून काढली.
टीनाला गौरीच्या चांगूलपणाची जाणीव झाली. तिने गौरीचे आभार मानले आणि हसून म्हणाली, “A friend in need is a friend in deed”. तेव्हापासून दोघींची छान गट्टी तर जमलीच पण टीनानेही सर्वांना मदत करायला, मिळून मिसळून वागायला सुरूवात केली.
मुलगी आणि तिचे चार मित्र | Mulagi aani Tiche Char Mitra Marathi Katha
एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते….तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.
तिचा पहिला मित्र …त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.
एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, “”माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.” या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, “”मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?”
“”अजिबात नाही,” असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. “”आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?”
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे “नाही’ म्हणतो. “”जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.”
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. “”तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस… यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?”
“”मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.”
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.
… तेवढ्यात एक आवाज येतो, “”मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.”
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, “”मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.”
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.
दुष्टांचा स्वभाव | Drushtancha Swabhav Marathi Katha
एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
तात्पर्य – वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.
देवाची चोरी | Devachi Chori Marathi Katha
शेतात काम करता करता एका शेतक-याचे फावडे हरवले. त्याला वाटले, मजुरांपैकी कोणी ते चोरले असावे. त्याने कसून चौकशी केली, पण कोणीही कबूल होईना. कोणीही काही त्याबाबत माहीत असल्याचेही सांगेना. तेंव्हा त्या शेतक-याने सा-या मजुरांना घेऊन जवळच्या गावातील मोठया देवळात जाऊन शपथ घ्यायला लावायचे, असे ठरविले.
ठरल्याप्रमाणे सर्व मजूरांना घेऊन तो शेतकरी त्या जागृत देवस्थानी गेला. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. थाळी पिटून तो मोठमोठयाने म्हणत होता की, ‘लोक हो, ऐका. आपल्या या जागृत देवस्थानातील देवांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची किंवा चोराची पुराव्यासह जो बित्तंबातमी देईल त्याला कोतवालसाहेब माठे बक्षिस देतील. ऐका हो, ऐका…’
ती बातमी ऐकून, शेतक-याला मोठा अचंबा वाटला, आणि तो स्वत:शीच म्हणाला, ‘चला, आल्या पावली घरी परत गेलेलेच बरे. इथल्या देवाला प्रत्यक्ष त्याच्याच देवळातल्या मौल्यवान वस्तू कोणी चोरल्या ते शोधून काढता येत नाही, तर माझं फावडं चोरणारा चोर, देव कसा काय शोधून काढेल?
तात्पर्य – देवच दुबळे ठरले तर त्यांच्यावर भरीभार का टाका? आपल्या प्रयत्नाइतका सामर्थ्यशाली देव दुसरा कोणी नाही.
जगातला मोठा गुन्हा | Jagatala Motha Gunha Marathi Katha
एका फासेपारध्याच्या जाळयात एक कवडा सापडला. त्याला पकडून न्यायला तो जेंव्हा जवळ आला, तेंव्हा तो पक्षी अगदी गयावया करून म्हणाला, ‘पारधीदादा जाऊ द्या मला. मी वचन देतो की, तुम्ही मला सोडलात तर दुस-या कवडयांना जाळयात पकडून देईन मी.’
पारधी त्याच्यावर ओरडला, ‘छे, मग तर मुळीच नाही सोडत तुला. तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कशाला सोडायचं? जो आपल्या निरूपद्रवी मित्रांचा विश्वासघात करू इच्छितो, तो साक्षात मृत्युपेक्षाही भयंकर!’
तात्पर्य – विश्वासघातासारखा जगात दुसरा भयंकर गुन्हा नाही.
मैत्रीच्या मर्यादा | Maitrichya Maryada Marathi Gosth
एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, ‘धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.’
एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, ‘या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!’
‘फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!’ धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. ‘बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!’
तात्पर्य – चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.
ससा आणि कासव | Sasa aani Kasav Marathi Story
कासवाने सशाला धावण्याच्या शर्यतीत हरवले. या अपमानाने ससोबा पांढर्याचे अगदी काळेनिळे झाले. ते काही नाही, या अपमानाचा बदला घ्यायचाच. ती डोंगरावर जायची शर्यत लांब पल्ल्याची म्हणून आपल्याला झोप लागली. सहा महिने उलटले. ससोबाने कासवाला जाहीर आव्हान दिले. यावेळी शर्यत लांब पल्ल्याची नव्हे तर शंभर मीटर होणार हे देखील त्याने जाहीर केले. कासवाला इच्छा नसतानाही शर्यतीला हो म्हणावेच लागले.
महिनाभराने शर्यत होणार. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स सगळीकडे हीच बातमी. काहींनी त्यावर कव्हरस्टोरी केली तर काहींनी खास बुलेटीन्स. पेज थ्री पासुन पेज ट्वेल्व्ह पर्यंत फक्त ससा आणि कासव. ही संधी सट्टेवाले कसे सोडतील. जोरदार बेटिंग चालू झाले. ससोबा हॉट फेवरीट! त्यांचा भाव कमी पण कासवाचा भाव एकास दहा.
आणि तो दिवस उजाडला. स्टेडीयम खचाखच भरलेले. दोघांचे पाठीराखे हातात बॅनर्स घेऊन जल्लोष करत होते. शर्यतीला झेंडा दाखवल्यावर स्टेडीयमवर शांतता पसरली. सगळेजण श्वास रोखून पाहू लागले. काही सेकंदात ससोबा फिनिश लाईन पलिकडे होते. कासव पार मागे पडले होते. कासव समर्थक पार निराश झाले आणि ससोबा समर्थकानी ससोबांची मिरवणूक काढली.
दोन दिवस उलटले आणि ‘सबसे तेज’ चॅनेलवर ब्रेकींग न्यूज झळकली.
“डोप टेस्ट पॉजिटीव्ह आल्याने ससोबांचे विजेतेपद काढून घेतले. कासव विजेता घोषित!”
टोपीविक्या आणि माकडं | Topivikya aani Makar Marathi Katha
करीम ज्युनियर टोप्या विकून परतत होता. रस्त्यात त्याला ते झाड नेहमीच खुणावायचे. याच झाडावरच्या माकडानी काही पिढ्यांपूर्वी त्याच्या खापरपणजोबांच्या टोप्या पळवल्या होत्या आणि मोठ्या चातुर्याने त्यांनी त्या परतही मिळवल्या होत्या.
हल्ली त्या झाडावरची माकडं कमी झाली होती तरी या पिढीतील काही हुप्पे अजूनही त्यावर राहात होते. दाढी वाढलेले बेढब हुप्पे तसे थोडे उग्रच दिसत होते. करीम ज्युनियर त्यांच्या वाटेला कधीच जात नसे आणि ते झाड तो जाणीवपूर्वक टाळत असे.
आज मात्र तो पार थकला होता. दूरवर विश्रांती घेण्यासारख एकही झाड नव्हत. नाईलाजाने तो झाडाखाली बसला. टोप्यांची थैली त्याने अगदी छातीशी कवटाळून ठेवली. थोड्यावेळाने त्याला डुलकी लागली.
जागा होउन पाहतो तर काय त्याच्या टोप्या घालून हुप्पे झाडावर बसले होते. त्याला आता आपल्या पूर्वजाने लढवलेली शक्कल आठवली. त्याने आपली टोपी काढून जमिनीवर फेकली. हुप्पे मात्र टोपी घालुनच आनंदाने उड्या मारत होते. ही शक्कल काही कामी आली नाही. शेवटी त्याने हात जोडून हुप्प्याना टोप्या परत करण्याची विनंती केली. वरुन एक हुप्प्या ओरडला “वेडा आहेस का. अरे आमचा एक दूरचा नातलग दाढी वाढवून आणि टोपी घालून प्रसिद्ध गायक बनला. आम्हीही कधीचे दाढी वाढवून टोप्यांची वाट पाहात होतो!”
सिंह आणि उंदीर | Sinh aani Undir Marathi Katha
सिंह महाराज आपल्या गुहेबाहेर ऊन खात बसले होते. तेवढ्यात एक उंदीर त्यांच्या अंगावर चढून खेळू लागला. महाराजांना राग आला. त्यांनी उंदराला पंज्यात पकडले. आता मात्र उंदीर घाबरला. गयावया करु लागला. ‘महाराज मला सोडा, मी पुढेमागे आपल्या उपकारांची फेड करेन’ असे म्हणू लागला. महाराज हसले. म्हणाले, ‘मी या जंगलचा राजा. तू इटुकला पिटुकला. मला काय मदत करणार?’ उंदीर आणखीच काकुळतीला आला. महाराजांना शेवटी दया आली आणि उंदराला अभय दिले.
वर्षा मागून वर्षे उलटली. राजेशाही जाऊन जंगलात लोकशाही आली. लोकशाही म्हणजे ओघाने निवडणूक आलीच. जोरदार निवडणूक झाली. महाराजांच्या पक्षानेही सगळ्या जागा लढवल्या. मात्र बहुमत कुणालाच मिळाले नाहि. सत्ता हातची जाणार की काय याचीच चिंता महाराजाना लागून राहिली. विरोधकांनीही जाळं जोरदार विणले होते.
एवढ्यात त्यांना फोन आला. “महाराज मी उंदीर बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही मला अभय दिले होते. आज त्या उपकारची फेड करायची वेळ आलेय. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. जर योग्य मोबदला मिळाला तर मी बाकी अपक्षांचा पाठींबाही तुम्हाला मिळवून देतो.”
अशा रीतीने महाराजांभोवती विरोधकांनी विणलेल्या जाळयातून महाराज सही सलामत बाहेर पडले.
अप्रामाणिक लाकुडतोड्याची गोष्ट | Apramanik Lakudtodyachi Gosht
प्रामाणिक लाकुडतोड्याला जलदेवतेने सोने, चांदी आणि लोखंडाच्या तीन कुर्हाडी बक्षिस दिल्या. त्याने त्या जपून ठेवल्या आणि प्रामाणिकपणे जगत राहिला. त्याच्यापुढच्या पिढ्या मात्र नालायक निघाल्या. त्यांनी त्या सोन्याचांदीच्या कुर्हाडी विकून खाल्या.
लाकुड तोडून काही फार कमाई होत नव्हती. या अप्रामाणिक लाकुडतोड्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. त्याच विहीरीत ही लोखंडी कुर्हाड टाकून प्रामाणिकपणाचे नाटक करुन आपण्ही सोन्या चांदीच्या कुर्हाडी मिळवू शकतो.
त्याने त्या विहीरीत मुद्दाम कुर्हाड टाकली. जलदेवतेचा धावा सुरु केला.
थोड्या वेळाने मिष्किल हसत जलदेवता बाहेर आली. हातात तीन कुर्हाडी होत्या, एक लोखंडाची, दुसरी चांदीची, तिसरी सोन्याची. ‘यातली तुझी कुर्हाड कुठली ती घे’, देवता म्हणाली. आता नाटक करणे शक्य नव्हते. चरफडत लाकुडतोड्याने आपली लोखंडी कुर्हाड घेतली आणि देवता अंतर्धान पावली.
घोडा आणि नदी | Ghoda aani Nadi Marathi Katha
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, ” निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल”.
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, “पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत.”
उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या….
यशाचे गमक | Yashachi Gamak Story in Marathi
महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.
न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.
महापुरुष | Mahapurush Marathi Katha
आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसर्यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे ?
आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.
मदत | Help Marathi Katha
अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली होती. आतील शिपाई उतरुन तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांच्यावरचा अंमलदार फक्त हुकूम देत होता.
त्याने मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब ! फक्त हुकूम देत उभे राहणेच त्याने पसंत केले. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली.
त्या गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना प्रत्यक्ष हातभार लावला. गाडी अडचणीतून बाहेर पडली. दुसर्या गाडीतून आलेला तो सज्जन अंमलदार साहेबाला म्हणाला, पुन्हा गरज पडली तर मला बोलवत जा आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदारला दिले.
त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरुन घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.
उशिरा येण्याची शिक्षा | Ushira Yenyachi Shiksha story in Marathi
Ushira Yenyachi Shiksha story in Marathi |
महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्या घंटेनंतर येत असे त्याला दुसर्या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे. एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.
नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात? जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.
मित्रांनो तुम्हाला या Marathi Katha आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
हे देखील वाचा
Shivaji Maharaj Quotes Status Sms Marathi